सोनिया गांधी यांचे मन वळविणे अवघड होते : बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 08:40 PM2020-01-24T20:40:05+5:302020-01-24T20:48:45+5:30
सत्तेत सहभागी होण्यासाठी कराव्या लागलेल्या कसरतीची कबुली
पुणे : दोन वर्षांपुर्वी याच सभागृहात मला दिलेल्या पुरस्कारावेळी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल, असे संयोजक म्हणाले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होईल वाटले होते. परिस्थिती बदलली. मात्र,त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे मन वळविणे अवघड होते. कारण तो विचारधारेचा प्रश्न होता, असे सांगत सत्ता स्थापनेसाठी कराव्या लागलेल्या कसरतीची कबुली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी येथे दिली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या वतीने अॅड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला. स्टॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शशिकला रावसाहेब शिंदे, कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, अध्यक्ष उद्धव कानडे या वेळी उपस्थित होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे प्रशांत गडाख यांना महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते अॅड. रावसाहेब शिंदे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा फुले पगडी, ग्रंथ, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
थोरात म्हणाले, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या पावसातील सभेनंतर सगळे चित्र बदलले. सत्तेत येण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांचे मन वळविणे अवघड होते. कारण काँग्रेसच्या विचारधारेचा प्रश्न होता. खासदार संजय राऊत यांच्याशीही चर्चा केली. ते आजारी असताना लिलावतीत जाऊन भेट घेतली. तेथेही माध्यमांचे कॅमेरे मागे होते. दिल्लीला गेलो तरी तीच स्थिती. शेवटी १७० आमदार एका सभागृहात जमा झाल्यानंतर तर, कॅमेऱ्यांची भिंतच समोर उभी होती. त्यावरुन राष्ट्रीय पातळीवर त्याला किती महत्त्व दिले गेले हे दिसून येते. राजकारणात असे प्रसंग घडत असतात.
रावसाहेब शिंदे म्हणजे नैतिक मूल्यांचा आग्रह धरणारे समाजसेवक होते. ते व्यक्ती नव्हे, तर संस्थाच होते, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ माशेलकर यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली. ‘मूलभूत संशोधन आणि विज्ञानात नव निर्मिती करणाऱ्या देशाची प्रगती होते. गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास हेच सांगतो. त्यामुळे शिंदे यांच्या नावाने विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क उभारावे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी या संस्थेचा उपयोग होईल, असे वासलेकर म्हणाले.
-----------
राज्यघटनेशी तडजोड करणाऱ्यांना खाली खेचा : थोरात
प्रत्येक व्यक्तीने देश मोठा होईल, हीच अपेक्षा ठेवली पाहिजे. चुकीची गोष्ट होत असल्यास त्यावर बोट ठेवून ते नाकारले पाहिजे. राज्यघटनेशी तडजोड होईल, अशी कोणतीही कृती नको. जनतेने त्यांना खाली खेचले पाहिजे. ही काळाची गरज आहे. अन्यथा इतिहास तुम्हा-आम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.