७९४ चा भार २७९ कर्मचाऱ्यांवर : हिवताप व हत्तीरोग विभागात कर्मचाऱ्यांची वानवा नागपूर : डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आणि रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी हिवताप व हत्तीरोग विभागाला निर्देश दिले आहेत, परंतु वाढती लोकसंख्या व रोगामुळे या विभागाला ७९४ कर्मचाऱ्यांची गरज असताना २७९ कर्मचारी काम करीत आहे, परिणामी डेंग्यूवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात फार मोठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे.उपराजधानीतील साथरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी १९६२ मध्ये महापालिकेने हिवताप व हत्तीरोग विभागाची स्थापना केली. सुरुवातीपासूनच या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी होती. १९९५ मध्ये हत्तीपायाच्या रुग्णांची संख्येत वाढ होताच या विभागासाठी १२० कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दिली होती त्यानंतर ते आतापर्यंत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक कर्मचारी सोडाच रिक्तपदेही महापालिकेने भरलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यांमुळे हत्तीरोगापासून ते हिवताप, चिकनगुनिया व डेंग्यूसारखे साथरोग नियंत्रणाबाहेर गेल्याचे वारंवार दिसून आले आहे. सध्या शहरात शासकीय रुग्णालयांपासून ते खासगी इस्पितळांपर्यंत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मनपाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत डेंग्यूचे ९२ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. असे असताना या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी हिवताप व हत्तीरोग विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून हिवताप अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. हत्तीरोग अधिकाऱ्याची दोन पदे मंजूर असताना एक पद रिक्त आहे. या विभागाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाची ११ पदे मंजूर असताना सात पदे रिक्त आहेत. हिवताप निरीक्षकांची १२ पदे मंजूर असून चार पदे रिक्त आहेत. वरिष्ठ क्षेत्र कर्मचाऱ्यांची १०४ पदे मंजूर असताना ४२ पदे मंजूर आहेत. हिवतापरोग विभागाची ७४ पदे रिक्त असताना ३१ पदे रिक्त आहेत तर हत्तीरोग विभागाची ३६१ पदे मंजूर असून १२५ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे वाढती लोकसंख्या व वाढत्या साथीच्या रोगाच्या तुलनेत या दोन्ही विभागाला अतिरिक्त ७९४ कर्मचाऱ्यांची गरज आहे. (प्रतिनिधी)घराघरांच्या झडतीत उणीवडेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात होती. परंतु पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहचणे अशक्य होत होते. याची दखल घेऊन आयुक्तांनी प्रत्येक झोनमधून दहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. परंतु झोनमधून याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे. दहा पैकी कुठे सात तर कुठे पाचच कर्मचारी मिळत आहे. यातच या सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने मोहिमेत उणिवांची भर पडत आहे.
डेंग्यू नियंत्रणावर खोडा
By admin | Published: September 23, 2014 1:06 AM