पुणे : महाविकास आघाडी सरकारने शपथ घेतली त्या दिवसापासून भाजपचे नेते इतक्या महिन्यात सरकार पडेल तितक्या महिन्यात सरकार पडेल असे सांगत आहे. पण आम्ही नुकताच एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे आता उरलेली चार वर्ष देखील भाजपच्या नेत्यांची हे सरकार टिकणार असे म्हणण्यातच जातील अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला होता. मात्र याच टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी जे फुकटात मिळवले आहे ते पचवावे मग आम्हाला सल्ले द्यावे. आम्ही तसेही राज्यात कणखर व सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहोत. आमचे राज्यात चांगले काम करतच आहोत. आमची काळजी जयंत पाटलांनी करू नये.
संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी दिल्लीला पाठवायला हवे...चंद्रकांत पाटलांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर देखील टिप्पणी केली. ते म्हणाले, बिहारमध्ये नितीश कुमार यांनी महाराष्ट्र पॅटर्न राबवला पाहिजे असा सल्ला देणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी आता दिल्लीतच पाठवायला हवे.
...................
रयत क्रांती संघटनेकडून चौगुले यांचा अर्ज दाखल.. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेकडून चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्यानुसार चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारी मागे घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल- सदाभाऊ खोत, आमदार व रयत पक्षाचे प्रमुख