ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 14 - पावसाला काहीच दिवस शिल्लक असल्यानं नवी मुंबईतल्या दिघ्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलण्याचा एमआयडीसीचा प्रस्ताव आज उच्च न्यायालयाने फेटाळला. यामुळे दिघावासीय निराश झाले आहेत.
शासकीय-निमशासकीय जागांवरील अनधिकृत बांधकामांवर जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात कुठलीही कारवाई करू नये, हा शासन निर्णय असल्याने एमआयडीसीनं हा प्रस्ताव न्यायालयात ठेवला होता. कारवाईबाबत नेमके काय करावे या संभ्रमात असलेल्या एमआयडीसीला सोमवारी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे कारवाई सुरूच ठेवावी लागणार आहे.
पावसाळ्यात इमारतीवर कारवाई शक्य नसली तरी या इमारती ताब्यात घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने आजच्या निर्णयात दिले आहेत. त्यानुसार कमलाकर आणि पांडुरंग या इमारतींचा ताबा मिळवा, असे देखील न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे दिघावासीयांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.