पुणे: सर्व्हरवर ताण येत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले डिजिटल सातबारा उता-याचे काम महसूल विभागाकडून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पुढील काळात राज्यातील सर्व जमिनधारकांना डिजिटल उतारे सहजपणे प्राप्त करून घेणे शक्य होणार आहे. शासकीय कार्यालयांचा डेटा क्लाऊडवर सेव्ह करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही.त्यामुळे सध्या सुरू झालेले काम सुरळीतपणे चालू राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्याच्या महसूल विभागाने डिजिटल सातबारा उतारे तयार करण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत सुमारे ४२ लाख सातबारा उता-यांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटल उताऱ्यांसाठी सर्व्हरवरील स्पेस कमी पडत असल्याने महसूल विभागातर्फे हे काम थांबविले होते. मात्र,पुन्हा एकदा या कामास सुरूवात करण्यात आली आहे. डिजिटल उतारे मिळविण्यासाठी नागरिकांनी भूमी अखिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा,असे आवाहन ई- फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी केले.महसूल विभागाने केलेल्या बदलानुसार डिजिटल उतारे प्राप्त करण्यासाठी आता संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक संकेतस्थळावर टाकल्यानंतर डिजिटल सातबारा उतारा प्राप्त होतो. पूर्वी डिजिटल सातबारा उता-यावर सक्षम अधिका-याचे नाव लहानशा अक्षरात लोगोवर छापले जात होते. परंतु,नवीन उता-यावर संबंधित अधिका-याचे नाव,त्यााने कोणत्या तारखेला उतारा दिला,याचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित उतारा वैध किंवा अवैध आहे, हे तपासण्यासाठी विशिष्ट क्रमांक दिलेला आहे.दरम्यान,राज्यातील आठ जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यात डिजिटल सातबारा उता-याचे काम सुरू आहे. पुणे विभागातील सांगली, सोलापूर,सातारा,कोल्हापूर या जिल्ह्यासह नाशिक,ठाणे,चंद्रपूर,गोंदिया या जिल्हांमधील डिजिटल सातबाराचे काम सुरू करण्यात आलेले नाही.मात्र,येत्या दोन दिवसात या जिल्ह्यातही डिजिटल उतारे तयार करण्याचे काम सुरू होईल.
डिजिटल सातबारा उता-याचे काम पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 9:40 PM
सर्व्हरवर ताण येत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले डिजिटल सातबारा उता-याचे काम महसूल विभागाकडून पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्देराज्यातील सर्व जमिनधारकांना डिजिटल उतारे सहजपणे प्राप्त करून घेणे शक्य होणार आत्तापर्यंत सुमारे ४२ लाख सातबारा उता-यांच्या डिजिटलायजेशनचे काम पूर्ण येत्या दोन दिवसात या जिल्ह्यातही डिजिटल उतारे तयार करण्याचे काम सुरू