पुणे : देशातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक प्रमाणपत्रे डिजीटल पध्दतीने जतन केली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहणे सहज शक्य होणार आहे. नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझटरी मार्फत या प्रमाणपत्रांचा डाटा जतन केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकश जावडेकर यांनी शनिवारी दिली. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २० व्या पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापतेसह आदी उपस्थित होते. यावेळी संत शिरोमणी जैन आचार्य विद्यासागरजी महामुनीराज यांना विद्यापीठाची डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आचार्य महामुनीराज यांच्या प्रतिनिधींनी या पदवीचा स्वीकार केला.प्रकाश जावडेकर म्हणाले, बनावट पदव्या तयार होऊ नयेत, दुसऱ्याच्या नावावर तोतया बनून कुणाला परीक्षा देता येऊ नये यासाठी पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्याथ्यार्चा फोटो छापणे बंधनकारक करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर आता सर्व विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांचा डाटा नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझटरी मार्फत एकत्र करून जतन केला जाणार आहे. यामुळेही पदवीची सत्यता पडताळून पाहणे सोपे होणार आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत त्याचे एकत्रीकरण केले जाईल.जगाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. इथून पुढच्या काळात गुवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल. आज डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून १ लाख ८० हजार ग्रंथ शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे जावेडकर यांनी सांगितले.शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात यंदा वाढ केली आहे. २०१४ मध्ये शिक्षणावर ४७ हजार कोटी रुपयांची तरतूद शिक्षणासाठी होती. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यामध्ये वाढ करून सव्वा लाख कोटीपर्यंत वाढवली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला. कुलगुरू प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे विद्यापीठाचा अहवाल सादर केला. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.