मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. पतंगराव कदम हे जवळपास पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली होती. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारतीय विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
पतंगरावांसह आमचे व्यक्तिगत संबंध होते महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकारण आणि राजकारण केले , पतंगराव कदम यांच्या अकस्मात मृत्यूने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री, महाराष्ट्र
पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ , उमदे, दिलखुलास व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राज्याच्या राजकारणाला , समाजकारणाला, सहकार व शैक्षणीक क्षेत्राला वेगळी ओळख करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. कधी काळी 2 खोल्यात सुरु झालेले भारती विद्यापीठ आणि आजचा त्याचा झालेला वटवृक्ष त्यांच्या कार्याची ओळख करून देते. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद
कसबा पेठेत छोटयाशा पत्र्याच्या खोलीत भारती विद्यापीठाचे कार्यालय सुरू केल्यापासून पंतगरावांचा आणि माझा परिचय होता. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अथक प्रयत्न, चिकाटी, शिक्षणाबदद्ल कमालीची ओढ, यातून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करीत त्यांनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहचवले. मिनमिळावू, सर्वांशी संपर्क असणारे, हसतमुख असा हा नेता होता. त्यांना मी कधीही चिडलेले पाहिलेले नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणाºया एका थोर नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली.
- गिरीश बापट
अत्यंत दुर्दैैवी अशी घटना आज घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शैैक्षणिक, सहकार क्षेत्रात खोल अभ्यास होता. शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पतंगराव. एक मनमोकळा, दिलदार नेता आणि आमचे ज्येष्ठ सहकारी गमावल्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे.
- हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री