ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 17 - गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करण्याची संधी हुकल्यामुळे संतप्त झालेले आमदार विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्यावर बोच-या शब्दात टीका केली आहे. दिग्विजय यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. त्यांनी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी जी चूक केली त्याची किंमत पक्षाला चुकवावी लागली आहे. संख्याबळ असूनही काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकले नाही असे विश्वजीत राणे म्हणाले.
गुरुवारी मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर विश्वजीत राणे यांनी लगेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विश्वजीत पक्षाचा व्हीप झुंगारुन विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अनुपस्थित राहिले. दिग्विजय यांना खरोखरच गोव्यात सरकार स्थापन करायची इच्छा होती का ? त्यांचा कारभार पाहून तरी तसे वाटले नाही असे विश्वजीत म्हणाले.
विश्वजीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे पुत्र आहेत. 17 आमदार निवडून आल्यानंतर पक्ष कार्यालयात झालेली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक एक विनोद होती. भरपूरवेळ ही बैठक चालली पण त्यात काहीही निर्णय झाला नाही. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हॉटेलबाहेर थांबले होते आणि आत बैठक सुरु होती. त्याचवेळी गोव्यातील भाजपा नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिल्लीतील नेत्यांबरोबर चर्चा करत होते. त्यांनी वेळ न दवडता आघाडीचे गणित जमवून आणले असे विश्वजीत म्हणाले.