सोलापूर: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे नागनाथ क्षीरसागर यांचा २७ ऑगस्टला तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा ३१ ऑगस्टपर्यंत शिवसेनेत जाहीर प्रवेश होईल, अशी माहिती शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीतील नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने सहा प्रमुख मतदारसंघात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. करमाळ्यातील राष्ट्रवादी नेत्या रश्मी बागल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. राष्टÑवादीचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष सोडण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी माने यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्याशी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती. यातील पाच जणांची नावे निश्चित करण्यात आली. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे. त्यामुळे नेत्यांनी विनाअट पक्ष प्रवेश करावा, असा निरोप ‘मातोश्री’वरून देण्यात आला होता.
गेल्या १५ दिवसांत तानाजी सावंत यांच्याकडे गणेश वानकर, दिलीप माने, नागनाथ क्षीरसागर यांच्या बैठका झाल्या. या बैठकीनंतर माने यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचेही या नेत्याने सांगितले. माने आणि क्षीरसागर यांचा एकाच दिवशी प्रवेश होईल. यावेळी सोलापूर दक्षिणसह मोहोळ मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित असतील. माने यांच्या प्रवेशानंतर मोहोळ मतदारसंघातील शाखा बांधणीला वेग दिला जाणार आहे.
सोपलांसाठी चर्चेची आणखी एक फेरी - शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी सोलापूर दक्षिण, बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातील रणनीतीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. आमदार दिलीप सोपल यांचा प्रवेश ३१ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र सोपलांसोबत शिवसेनेच्या नेत्यांची आणखी एक चर्चेची फेरी होणार आहे. या फेरीनंतरच सोपलांच्या सेना प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल, असेही या नेत्याने सांगितले.