राजगुरुनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदी खेड तालुक्यातून कोणाचीच वर्णी न लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, गेल्या आठवड्यात जाहीर केल्याप्रमाणे खरंच मोहिते ‘वेगळा’ निर्णय घेऊन पक्ष सोडणार का? याची चर्चा रंगली आहे. दरम्यान कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया मोहिते यांनी दिली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सातपैकी फक्त दोन जागा मिळाल्या आणि पंचायत समितीची सत्ताही हातातून गेली. त्यामुळे गेल्या आठवड्यात मोहिते यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये पक्षनेत्यांच्या दुटप्पी धोरणामुळेच पक्षाला उतरती कळा लागली असल्याची टीका केली होती. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहिते विरोधकांना पक्षाच्या नेत्यांकडून विशेषत: अजित पवार यांच्याकडून बळ दिले जात असल्याने मोहिते गेली अनेक वर्षे अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही मोहिते यांनी जिल्हा बँक व बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित केली होती. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पक्षाची पीछेहाट झाली. तालुक्यामध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी निदान जिल्हा परिषदेमध्ये एक तरी सभापतिपद मिळावे अशी त्यांनी मागणी केली होती. गेल्या वेळी सातपैकी सहा सदस्य निवडून आणूनही एकही पद न दिल्यामुळे मोहिते यांनी आगपाखड केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या सभापती निवडीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र खेड तालुक्याला डावलले. दरम्यान मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी टीका केली असली तरी त्यामागे माझा वैयक्तिक स्वार्थ नव्हता तर पक्षहित होते. परंतु यामधूनही पक्षाचे नेते जर धडा घेत नसतील तर मी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून माझी भूमिका लवकरच जाहीर करणार आहे. (वार्ताहर)>भाजपात जाणार? दरम्यान, मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात जाणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यांचे जवळचे स्नेही भोसरीचे आमदार महेश लांडगेंनी ज्या वेळी भाजपात प्रवेश केला त्या वेळीच मोहितेही प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश ही केवळ औपचारिकता राहिली आहे असाही सूर कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. परंतु यापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये जाऊन स्थिरस्थावर झालेल्या नेत्यांची या प्रवेशाला संमती असेल की विरोध असेल याबाबत संभ्रमावस्था आहे.
दिलीप मोहिते राष्ट्रवादी सोडणार?
By admin | Published: April 04, 2017 1:25 AM