शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखाते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 03:16 AM2021-04-06T03:16:52+5:302021-04-06T07:12:22+5:30
वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
मुंबई : अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असतील. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती.
आता उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सायंकाळी पाठविला असून तो स्वीकारावा, अशी विनंती त्यांना केली होती. याच पत्रात त्यांनी, वळसे पाटील यांच्याकडील सध्याची खाती अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्याची विनंती केली होती. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली.
वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हेदेखील आमदार होते. गृहमंत्रिपदासाठी शरद पवार कोणाला संधी देतात, याविषयी दिवसभर जोरदार चर्चा होती. जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळलेदेखील आहे. त्याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, पवार यांनी वळसे पाटील यांच्या नावाला पसंती दिली. अजित पवार यांनीही वळसे पाटील यांच्या बाजूने कौल दिला, असे सूत्रांनी सांगितले.
वळसे पाटील यांचा प्रवास
दिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. अत्यंत अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे.