प्रभू पुजारी
पंढरपूर : डोक्याला पागोटा बांधलेला़़़ धोतराचा खोचा गुडघ्यापासून वर खोवलेला़़़ कपाळी टिळा, अष्टगंध अन् बुक्का लावूऩ़़ हातात भगवी पताका घेऊऩ़़ टाळ मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष करीत अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने झपाझप पावले टाकत आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत आहेत़ हे चित्र पाहून‘दिंडी चालली चालली...विठ्ठलाच्या दर्शनाला..घुमे गजर हरिनामाचा...भक्त नामात दंगला.., या भक्तीगीताची नक्कीच आठवण येते़महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज या प्रमुख पालख्यांसह अन्य पालख्या शनिवारी वाखरी मुक्कामी आल्या आहेत. शिवाय कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत चंद्रभागा तीराच्या पलीकडे ६५ एकर परिसरात दाखल होऊ लागल्या आहेत.
आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा १२ जुलै रोजी असल्याने पंढरपूर शहर व परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे. रेल्वे, एस़ टी़ आणि खासगी वाहनानेही वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले आहेत़ त्यामुळे पंढरपुरात गर्दी झाली आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारचा भंडीशेगाव येथील मुक्काम आटोपून शनिवारी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण दुसरे तर चौथे गोल रिंगण झाले़ त्यानंतर वाखरी येथे पालखी सोहळा मुक्कामी विसावला
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोली येथील मुक्काम करून बाजीराव विहीर येथे उभे रिंगण झाल्यानंतर वाखरी मुक्कामी पोहोचला़ तसेच संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताई याही पालख्या वाखरीला मुक्कामी विसावल्या आहेत़ या सर्व पालखी सोहळ्यांमधील लाखो वारकरी वाखरी मुक्कामी असतील़ त्यामुळे वाखरी येथे वारकºयांच्या वैष्णवांचा मेळा पाहावयास मिळत आहे़
दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे- टाळ-मृदंगांचा निनाद.. सतत होणारा हरिनामाचा गजऱ.. प्रत्येकाला पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ..यामुळे अनेक वारकरी आता पंढरीत दाखल झाले आहेत़ दाखल झालेले वारकरी आपापले साहित्य मठ, मंदिर, धर्मशाळा आदी ठिकाणी ठेवून चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शन रांगेत सहभागी होण्याची लगबग सुरू आहे़ त्यामुळे बुधवारी दर्शनरांग ही गोपाळपूरच्या पुढे गेल्याचे दिसून आली़ आषाढी वारीचा मुख्य सोहळा शुक्रवारी असल्याने पंढरीतील सर्व मार्गावरून भाविकांचे जथ्थ्येच्या-जथ्थे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे़
दिंड्यांंची सोय ६५ एकर परिसरात- राज्याच्या कानाकोपºयातून आषाढी सोहळ्यासाठी येणाºया दिंड्यांची सोय ६५ एकर परिसरात करण्यात आली आहे़ दिंड्यातील भाविकांसाठी या परिसरात वीज, पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा आदी सर्व प्रकारची सोय करण्यात आली आहे़ दिंडी प्रमुखांनी आपण नोंदणी केलेल्या प्लॉटमध्ये तंबू मारावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार किशोर बडवे यांनी केले आहे़