पंढरपूर : कोरोनाच्या नावाखाली मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. यामुळे कायदेशीर कारवाई करण्याबाबत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने नोटीसा दिल्या आहेत. त्याला न जुमानता पंढरपुरातून पायी दिंडी काढणारच, असा पवित्रा शुक्रवारी मराठा समाजाने घेतला आहे.शनिवारी होणाऱ्या आंदोलनाला गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहरात काही भागात संचारबंदी व जमावबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तरीही मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात येणारच, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे.या बैठकीदरम्यान आम्ही पंढरपूरमध्ये पायी दिंडी आणत नसून पंढरपुरातून बाहेर जाणार आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. मोजक्याच लोकांना दिंडी काढण्यासाठी परवानगी द्यावी. अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मोर्चा काढणारच, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजातील बांधवांनी घेतली आहे. यावेळी मराठा मोर्चाचे समाज समन्वयक महेश डोंगरे, किरण घाडगे, संदीप मांडवे, स्वागत कदम, सतीश शिंदे, अर्जुन चव्हाण, संदीप मुटकुळे उपस्थित होते.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपुरातून दिंडी निघणारच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 1:54 AM