नाशिक - Narhari Zirwal on viral Photo ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, त्यातच दिंडोरीचे मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ फोटोत दिसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले गेले. झिरवाळ हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या तुतारीचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात आला. हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द नरहरी झिरवाळ यांनी या फोटोचा खुलासा केला आहे.
नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी भगरे यांचा प्रचार करत असल्याची चुकीची बातमी फोटोच्या माध्यमातून पसरवली गेली. त्यामागची खरी कहाणी वेगळी आहे. एका धार्मिक कार्यक्रमावेळी भूमिपूजन करतानावेळीचा तो फोटो आहे. त्याठिकाणी मी आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर आहेत त्यांच्या बाजूच्या खुर्चीत मी बसलो. मी त्यांच्याशी बोलत होतो, तेव्हा कुणीतरी बागुल सरांना तिथून उठवलं आणि भास्कर भगरेंना तिथे बसवले. त्यावेळी तिथे कुणीतरी हा फोटो काढला आणि व्हायरल केला. परंतु अशाप्रकारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आता मतदार एवढा खुळा राहिला नाही असा टोला विरोधकांना लगावला.
नेमकं काय घडलं?
दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे मारूती मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी आमदार नरहरी झिरवाळ आमंत्रणावरून गेले होते. त्याचवेळी गावात मविआ उमेदवार भास्कर भगरे यांची प्रचारसभा होती तेव्हा गावकऱ्यांना भगरे यांनाही तिथे व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरला. त्या व्यासपीठावर मविआचे उमेदवार भगरे आणि महायुतीचे आमदार झिरवाळ एकत्र फोटो काढण्यात आला आणि हाच फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला.
नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते अजित पवार गटात आहेत. अजित पवार गटातील आमदार मविआ उमेदवारासोबत दिसल्याने महायुतीत खळबळ माजली. याठिकाणी महायुतीच्या भाजपा उमेदवार भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे झिरवाळ हे अजित पवारांना सोडून शरद पवार गटात परतणार अशी चर्चा आणि दावे होऊ लागले. त्यानंतर या संपूर्ण घडामोडीवर झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिले.