ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - दै. लोकमतचे समूह संपादक श्री. दिनकर केशव रायकर यांना राज्य शासनाचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी व श्री विजय विश्वनाथ कुवळेकर यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार असून ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. लक्ष्मण जोशी यांना २०११ सालचा तर कुवळेकर यांना २०१२ सालचा आणि दिनकर रायकर यांना २०१३ सालचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिनकर रायकर यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात ५० वर्षांचा अनुभव असून त्यांनी याआधी इंडियन एक्स्प्रेसचे मुंबई शहर आवृत्तीचे संपादक, दै. लोकमत व लोकमत टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. सध्या दै. लोकमतचे समूह संपादक असलेल्या रायकर यांना पुढारीकार ग.गो.जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लक्ष्मण जोशी हे सध्या लोकशाही वार्ताचे संपादक असून त्यांनी दै.तरूण भारतमध्ये वार्ताहर पदापासून ते मुख्य संपादक पदापर्यंत काम केले आहे. याशिवाय त्यांनी गोमंतक, गोवादूत, मुंबई तरूण भारत, जळगाव तरूण भारतमध्ये संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. पत्रकारितेत ४५ वर्षांहून अधिक काळचा अनुभव असलेल्या जोशी यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला आहे.
विजय कुवळेकर यांनी मुख्य संपादक सकाळ, संपादक लोकमत, मुंबई तसेच संपादक सकाळ, कोल्हापूर अशी जबाबदारी सांभाळली आहे. ३३ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेतला अनुभव असलेले कुवळेकर यांना जीवनगौरव रत्नदर्पण, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, कै. सुशीलादेवी देशमुख पुरस्कार मिळाले आहेत.