एकनाथ शिंदेंच्या घरी स्नेहभोजनाचा घाट! मंत्रिमंडळातील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:02 PM2023-08-16T12:02:07+5:302023-08-16T12:02:44+5:30
पहिली एक भाकरी मिळणार होती, ती आता तुकड्यांमध्ये वाटून घ्यावी लागणार; मागून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले वगैरे प्रतिक्रिया शिंदे गटाकडून अजित पवार आणि त्यांचे नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यावर आल्या होत्या.
एकीकडे वर्षभरापूर्वी ज्या अजित पवारांच्या निधीवाटपावरून नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदेंनी सत्तांतर घडविले त्याच अजित पवारांसोबत आता मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे. यातच अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघाचे दौरे करण्यास सुरुवात केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अशातच शिंदे गटामध्ये कानामागून आली आणि तिखट झाली असे वातावरण असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी सर्व मंत्रिमंडळाला स्नेहभोजनाला बोलविल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
पहिली एक भाकरी मिळणार होती, ती आता तुकड्यांमध्ये वाटून घ्यावी लागणार; मागून आले आणि पहिल्या पंक्तीत बसले वगैरे प्रतिक्रिया शिंदे गटाकडून अजित पवार आणि त्यांचे नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यावर आल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आताही धुसफूस सुरुच आहे. बच्चू कडू उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत. शिंदे गटाचे अन्य नेते देखील यात आहेत. यातच पवारांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याने या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच धुसफुस मिटविण्यासाठी शिंदेंनी उद्या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांसाठी आपल्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यातून मंत्री आणि आमदारांमध्ये सुरु असलेली मंत्रिमंडळ विस्तार, मतदारसंघ आणि उमेदवारीची धुसफुस शांत करता येईल का, असा सवाल विचारला जात आहे.