सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात असून त्यांचे समर्थक सोमवारी रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
केसरकर यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करत शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले होते. शिंदे सोबत पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला असतना केसरकर यांनी शिंदे गटाची परखड बाजू देशभरातील प्रसारमाध्यमांत मानली होती. त्याचवेळी केसरकर यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. मात्र मंत्रिपदाची संख्या कमी आणि बंडखोरी केलेले आमदार जास्त अशात कुणा कुणाला मंत्रीपद मिळणार ही शंकाच होती. अशातच आज होत असलेल्या शिंदे गटाच्या पहिल्या मंत्रीमडळ विस्तारात केसरकर यांचे स्थान निश्चित मानले जात आहे.
सततची न्यायालयीन लढाई त्यातच मूळ शिवसेनेकडून बंडखोरांवर मारण्यात आलेला गद्दारीचा शिक्का या सगळ्या पार्श्वभूमीवर केसरकरांचा जर शिंदे गटाचा प्लॅन फसला तर त्यांना भाजप शिवाय पर्याय उरणार नसल्याचे आताच दिसू लागले आहे. मात्र या सगळ्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची राहणार आहे.
राणेंशी वैरकेसरकर यांना राणेंशी घेतलेले वैरही महागात पडण्याची शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी केसरकर राष्ट्रवादीत होते, त्यांनी शरद पवार सावंतवाडीत निलेश राणेंच्या प्रचारासाठी आलेले असताना पवारांना प्रचारास नकार दिला होता. इथूनच जिल्ह्यातील वातावरण फिरले होते. नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेला दीड लाखावर लीड मिळाले आणि नारायण राणेंना पहिला धक्का बसला. कोणालाही उभे केले तरी त्याला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या राणेंचा मुलगा पडला होता. यानंतर केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकारमध्ये राज्य मंत्री पदही भूषविले. आता ते शिंदे गटाची बाजू मांडताना सारखे मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली, मी त्यांना नाही म्हटले. मोदींशी माझे चांगले संबंध आहेत, असे बोलत होते. तसेच दुसरीकडे राणेंवर टीकाही करत होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस विचारसरणीचा होता पण नंतर जसजसे नेते बदलले तस तशी विचारसरणी ही बदलू लागली गेल्या आठ वर्षांपासून या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे.मात्र त्या तुलनेत भाजप ही काहि कमी नाही 2014 मध्ये पहिल्यांदाच भाजपने विधानसभा निवडणूक लढवून अपेक्षे पेक्षा जास्त मते घेतली तर 2019 मध्ये शिवसेना भाजप युती चा उमेदवार म्हणून दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला असतना. भाजप नेते राजन तेली यांनी युतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत केसरकरांच्या नाकात दम आणला या निवडणूकीत केसरकर अवघ्या तेरा हजार मतांनी निवडून आले होते.