मुंबई : यंदाची दिवाळी अधिक समृद्ध आणि सुमधुर करण्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे, ‘दीपज्योती नमोस्तुते’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मित्रपरिवारासहित आप्तेष्टांसोबत दिवाळीचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी ‘दीपोत्सव व पुरस्कार सोहळा’ हा कार्यक्रम रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. २९ आॅक्टोबर रोजी शनिवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. दिवाळी सांज अधिकच मंगलमय करण्यासाठी, मराठी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी या वेळी उपस्थित राहाणार आहे. पुष्कर श्रोत्री, सुदेश भोसले, पूर्वा भावे, दीपाली सय्यद, मंगेश बोरगावकर, भार्गवी चिरमुले, अजित परब, विजय कदम, पुष्कर जोग, पद्मश्री कदम, केतकी पालव, नंदेश उमप असे कलाकार रसिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला सूरमयी संगीताची झालरही आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)रसिकांसाठी ‘दीपोत्सव’ विशेष सवलतीतयंदा लोकमत ‘दीपोत्सव’ची समृद्ध मैफल ‘प्रवास’ या सूत्राभोवती गुंफलेली आहे. त्याचबरोबर, रतन टाटा, प्रिसिला चान, गिरीजा देवी, विक्कू विनायकराम यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक या ठिकाणी रसिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.
‘दीपज्योती नमोस्तुते’चे सूर गुंजणार
By admin | Published: October 28, 2016 4:14 AM