मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ आणि दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे गळीगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षप्रमुख शरद पवार यांनी उभारी देण्याचे काम केले होते. परंतु, ऐन प्रचाराच्या काळात पक्षात सावळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसून आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले. मात्र हा सावळा गोंधळ कुटनितीचाच भाग असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारला कोणत्याही परिस्थितीत खाली खेचण्यासाठी अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. जळगाव येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली.उमेदवारी देण्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. एबी फॉर्म देण्यावरूनही गडबड झाली. तर पैठणमध्ये एकाचवेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. एवढच काय तर पुणे जिल्ह्यातील दोन मतदार संघात राष्ट्रवादीने उमेदवारांना एबी फॉर्मच दिले नाही. तसेच काँग्रेसला देखील ते मतदार संघ देण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीला काय साधायचा होतं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत होता.
या व्यतिरिक्त खुद्द अजित पवारांनी सोलापूरमधील करमाळा आणि सांगोला येथील राष्ट्रवादीच्याच उमेदवारांविरुद्ध भूमिका घेतली. या दोघांना राष्ट्रवादीने खुद्द उमेदवारी जाहीर केली होती. एकूणच या घडामोडींवरून राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू असल्याचे बोलले जावू लागले. मात्र या तडजोडी कुटनितीचा भाग असल्याची कबुली आता शरद पवारांनी दिली.