राजेंद्र शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे : एकेकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकत आहे. यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने, पुन्हा एकदा भाजप व काँग्रेसमध्येच खरी लढत रंगणार आहे. आता निवडणुकीतून बाद झालेले ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ हे पक्ष पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या मतदारसंघात तिरंगी लढत होईल असे सुरुवातीला चित्र होते. मात्र, लढत आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होणार हे स्पष्ट झालेले आहे. आतापर्यंत या दोन पक्षांच्या उमेदवारांनाच या मतदारसंघात मतदारांनी संधी दिलेली आहे. त्यामुळे यावेळीही हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात राहावा यासाठी भाजपसह काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या मतदारसंघासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नेते, उमेदवार सर्वोतपरी प्रयत्न करीत असले तरी मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतील, ते निकालानंतर समजेल.
‘वंचित’ची संधी हुकली, ‘एमआयएम’ने उमेदवार दिलाच नाही
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रेहमान यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ते शासकीय सेवेचा लाभ घेत असल्याच्या तांत्रिक कारणावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत त्यांचा अर्ज बाद केला. तर या निवडणुकीत धुळे शहर व मालेगाव मध्य मध्ये एमआयएमचे आमदार असतानाही त्यांनी उमेदवार दिला नाही. तसेच अद्याप कोणाला पाठिंबाही जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता भाजपचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यातच सरळ लढत होणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
आघाडीतील नाराजी नाट्य संपले, युती एकसंघ
महाविकास आघाडीत सुरुवातीला उमेदवाराच्या घोषणेवरून नाराजी नाट्य रंगले होते. मात्र, आता ते शमले असून सर्व गट एकत्र आहे. महायुतीतर्फे डॉ. भामरे यांची उमेदवारी बरऱ्याच आधी जाहीर झाली. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला. महायुती एकसंघ दिसून येत आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या मुंबई-दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला गेल्या अनेक वर्षांपासून चालना मिळालेली नाही. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे घोंगडे चार सर्वेक्षण होऊनही भिजतच पडलेले आहे. हा रेल्वे मार्ग मार्गी लावण्याची गरज आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा टेक्सटाइल पार्क हा देखील रखडलेला आहे. तो पूर्ण झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळू शकेल.
२०१९ मध्ये काय घडले?
डॉ.सुभाष भामरे - भाजप (विजयी) ६,२३,५३३ कुणाल पाटील - काँग्रेस ३,८४,२९० नाबी अहमद- वंचित बहुजन आघाडी ३९,४४९नोटा - २,४७५
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के२०१४ डॉ.सुभाष भामरे भाजप ५,२९,४५० ५४%२००९ प्रताप सोनवणे भाजप २,६३,२६० ५१%२००४ बापू चौरे काँग्रेस २,१०,७१४ ४९%१९९९ रामदास गावित भाजप २,११,९०४ ५२%१९९८ डी. एस. अहिरे काँग्रेस २,७४,०३४ ४८%