मुंबई : नव्या वर्षात आता पोलीस दलातील कॉन्स्टेबलपासून साहाय्यक फौजदारापर्यंत प्रत्येकाला आता गणवेश साहित्याऐवजी वर्षाला ५ हजार १६७ रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत गणवेशाच्या साहित्याचे वितरण करावे, असे आदेश पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी घटकप्रमुखांना बजावलेले आहेत.राज्यातील एक लाख ८८ हजार ८३२ जणांना जानेवारी व फेबु्रवारी महिन्यात गणवेशाच्या साहित्याऐवजी भत्ता दिला जाणार आहे. त्यासाठी तब्बल ९७ कोटी ५६ लाख ९४,९४४ रुपयांचे वितरण केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पोलीस दलातील कॉन्स्टेबल ते साहाय्यक फौजदारापर्यंत दरवर्षी दोन वेळा प्रत्येकी ३ मीटर कापड आणि दोन चामड्याचे बूट दिले जातात, संबंधित आयुक्तालय व जिल्हा अधीक्षक कार्यालयातील मुख्यालयाकडून वितरण केले जाते. मात्र निविदा काढून मागविण्यात आलेल्या खाकी कापडाचा दर्जा निकृष्ट असल्याने त्याबाबत नेहमी ओरड होत असते. त्यामुळे बहुतांश जण खात्याकडून मिळणारे कापड वापरण्याऐवजी स्वत: खासगीतून विकत घेतलेल्या कापडाचे युनिफार्म शिवतात, ही वस्तुस्थिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून उपनिरीक्षकांना याच कारणावरून गणवेश भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यांच्याप्रमाणेच आता या कर्मचाऱ्यांनाही गणवेश भत्ता देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गणवेशाऐवजी आता पोलिसांना थेट भत्ता
By admin | Published: December 02, 2014 4:39 AM