नाशिक : ‘कधी नव्हे तो सकल मराठा समाज मोर्चाच्या माध्यमातून पहिल्यांदाच इतका एकत्र आला. मात्र, आज या मोर्चाबाबत काही गोष्टी धाडसाने बोलण्याची वेळ आली आहे. मराठा मोर्चाची दिशा भरकटली असून कोणी तरी हेतुपुरस्सर या मराठा मोर्चाची दिशा भरकटवण्याचे काम करीत आहे,’ असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केला.मराठा मोर्चामुळे अन्य समाजाला काहीसे भय वाटून मराठा समाजाविरोधात सर्वच समाज एकत्र येत आहेत. जी मंडळी हेतुपुरस्सर मराठा मोर्चाची दिशा भरकटवण्याचे काम करीत आहेत, त्यांचे नाव घेऊन आपल्याला त्यांना मोठे करायचे नाही. मात्र, मराठा समाजासाठी चांगले करता येत नसेल, तर किमान समाजाचे वाईट तरी कोणी करू नये, असेही मेटे यांनी सांगितले.शिवसंग्राम पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, येत्या २० जानेवारीला पुण्यात शनिवारवाडा येथे पक्षाची व चिन्हाची घोषणा करणार असल्याचे सांगून सर्वसाधारण समाजाला आर्थिक बळ देण्यासाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना शिवसंग्राम संघटनेच्या मागणीमुळे झाली, असा दावाही आ. मेटे यांनी केला. विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसंग्राम पक्षाचे कोणतेही चिन्ह नसल्याने भाजपाच्या चिन्हावर पक्षाला निवडणूक लढवावी लागली. आता मात्र १२ जिल्हा परिषद व सहा महापालिका निवडणुकांमध्ये पक्ष स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>एकत्र लढण्यास तयारविधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम संघटना यांनी भाजपाशी युती केली होती. निवडणुकीनंतर शिवसेनाही महायुतीत सामील झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र दोन्ही पक्ष युतीवरून अडले आहेत. आमच्यासारख्या छोट्या घटकपक्षांना सोबत न घेतल्यास आम्ही तीनही घटक पक्ष एकत्र येऊन महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका लढण्यास तयार आहोत, असा इशारा खासदार राजू शेट्टी व आमदार विनायक मेटे यांनी शिवसेना-भाजपाला दिला.
मराठा मोर्चाची दिशा भरकटली
By admin | Published: January 19, 2017 5:13 AM