एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस यांची आतार्पयतची राजकीय कारकीर्द आहे. ती घडविताना व घडताना संघ व पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची साथ लाभली. याशिवाय त्यांच्यातील उपजत नेतृत्व गुणांचाही त्यांना लाभ झाला.
लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तसेच पक्षसंघटनेत पदाधिकारी म्हणून काम करताना जी सीमारेषा पाळावी लागते, त्याचे ज्ञान देवेंद्र यांना आहे. त्यातूनच त्यांनी दोन्ही पातळ्यांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला. प्रथम महापौर म्हणून काम करताना शहर विकासाचा अजेंडा निश्चित केला. त्याचा फायदा त्यांना आधी पश्चिम नागपूर आणि नंतर दक्षिण पश्चिम नागपूरचा आमदार म्हणून काम करताना झाला. प्रश्न समजून घेणो आणि त्यासाठी सांसदीय आयुधांचा चपखल वापर करून ते सोडवण्यासाठी सुयोग्य पाठपुरावा करणो, ही त्यांची शैली त्यांना विविध व जटील प्रश्न निकाली काढण्यासाठी कामी आली. हीच बाब पक्षसंघटनेत काम करतानाही उपयोगी पडली. लहानातील लहान कार्यकत्र्याना विश्वासात घेऊन पक्षाने निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर त्यांनी भर दिला़ म्हणूनच 2क्14 या एकाच वर्षी प्रथम लोकसभा आणि नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राज्यात पक्षाचे नेतृत्व करताना ते कधी गोंधळलेले दिसले नाहीत. संघ शाखेत जात असल्याने तेथील संस्कारांचा पगडा त्यांच्या विचारांवर निर्माण झाला.
संघातील त्या काळातील ज्येष्ठ नेत्यांचा सहवास त्यांना जसा लाभला तसाच सुमतीताई सुकळीकर यांच्यापासून ते प्रमोद महाजन, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह पक्षाचे लालकृष्ण अडवाणी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभत गेले. त्यामुळे प्रथम नगरसेवक म्हणून, त्यानंतर महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारर्कीद यशस्वी ठरत गेली.