मुंबई : राज्य बँकेमधील कथित घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलासा केला. याचबरोबर त्यांनी बंदी आणलेल्या पीएमसी बँकेचा संचालक कोण आहे, याचाही शोध घेण्याचे आव्हान पत्रकारांना केले. यानंतर पीएमसी बँकेचा संचालकाने व्हिडीओ प्रसिद्ध केला असून तो भाजपचा आमदार पूत्र आहे.
पीएमसी बँकेवर कर्ज वाटपावरून रिझर्व्ह बँकेने सोमवारी परिपत्रक काढून निर्बंध लागू केले. रिझर्व बँकेने बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ अन्वये ही कारवाई केली आहे. यामुळे भाजप आमदार सरदार तारा सिंग यांचे पूत्र आणि बँकेचे संचालक रणजीत सिंग यांनी व्हिडिओद्वारे बँकेच्या खातेदारांसमोर बाजू मांडली आहे.
अजित पवार यांनी आज म्हटले की, सहकारमध्ये काम करताना काय अडचणी असतात त्या 10 कोटी लोकांपैकी 1 कोटी लोकांनाच माहिती आहे. मात्र, माध्यमांमधून उरलेल्या 8-9 कोटी लोकांना वाटते भ्रष्टाचारच केला. आता यांना कुठे जाऊन सांगणार की 12 हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल, असाही प्रश्न उपस्थित केला. तसेच माझ्यासह भाजपाचे अन्य नेतेही संचालक होते. नुकत्याच बंदी आलेल्या पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा, असे आव्हान अजित पवारांनी पत्रकारांना दिले.