ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून गंगाधर म्हमाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हमाणे यांच्याकडे सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. या पदाचा अतिरिक्त कार्यभारही म्हमाणे यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षण संचालक नामदेव जरग हे दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदावर म्हमाणे यांची बदली होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार राज्य शासनाने म्हमाणे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून पदभार सोपविला. राज्य शिक्षण मंडळामार्फत नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर इयत्ता दहावीचा निकाल दोन-तीन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिकांचे वाटप, पुर्नमुल्यांकन, गुणपडताळणी, पुढील महिन्यात होणाºया पुर्नपरीक्षेची तयारीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या काळात नवीन राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी नवीन अधिकाºयांची नियुक्ती न करता म्हणाणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष म्हणून तेच दहावीचा निकाल जाहीर करतील.