पाली : सुधागड तालुक्यातील चिवे तसेच आजूबाजूच्या आदिवासी वाड्या पाड्यांना जाण्यासाठी पाली-खोपोली रस्त्यावर घोड्याचा डोह येथून जिल्हा परिषदेचा अंतर्गत रस्ता जातो. या रस्त्याचा क्र. १८ असून हा मजरे जांभूळपाडा येथील गट नंबर २९१ मधून जातो. या गट नंबरचा काही भाग हा बिना लाड यांच्या नावावर असून त्यांनी या गावांमध्ये जाणारा रस्ता जिल्हा परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पूर्णपणे उध्वस्त केला आहे. रस्ता उध्वस्त केल्यानंतर लाड यांनी गावकऱ्यांना पर्यायी रस्त्याची सोय करून दिली असली तरी पर्यायी रस्ता हा कच्च्या स्वरूपात असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कच्च्या रस्त्याची दुरवस्था होणार आहे. यामुळे गावकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. लाड यांनी जिल्हा परिषदेचा रस्ता जेसीबी लावून उध्वस्त केल्यानंतर देखील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात का झाली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. याआधी विडसई वाफेघर येथील वसुधा सोसायटी यांनी तसेच ताडगाव खेमवाडी येथील बॉम्बे ९९ प्रकल्पाच्या वेळी असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन उभारणार असून रस्ता उध्वस्त करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी सांगितले.चिवे आदिवासीवाडीजवळ लाड यांचे फार्महाऊस असून फार्महाऊसला लागूनच पाझर तलाव आहे. या पाझर तलावाचा वापर लाड हे अनधिकृतपणे करत आहेत. या पाझर तलावात त्यांनी परदेशी बनावटीच्या बोटी सोडल्या आहेत. पाली - खोपोली राज्य महामार्गावर घोड्याचा डोह येथे अनधिकृत कमान उभारली असून त्यामुळे अपघाताचे प्रसंग देखील उद्भवू शकतात. (वार्ताहर)जिल्हा परिषदेच्या मालकीचा असलेला रस्ता कोणतीही अधिकृत परवानगी न घेता संबंधित व्यक्तीने उखडला आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता अलिबाग यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.- राहुल चव्हाण, उपअभियंता, जिल्हा परिषद, सुधागड
चिवे येथील रस्ता उखडल्याने गैरसोय
By admin | Published: June 10, 2016 3:09 AM