ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागांतील बेघर व दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना इंदिरा आवास योजनेद्वारे घरकुले देण्यात आली आहेत. यामुळे बेघर कुटुंबे आता जिल्ह्यात शिल्लक राहिली नाहीत. तरीदेखील, प्रतीक्षा यादींमध्ये शिल्लक असलेल्या बेघर कुटुंबीयाचा शोध घेऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. आदिवासी, मागासवर्गीय कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरकुलांपासून कोणीही उपेक्षित राहिले नाही. त्यानुसार, या वर्षाचा घरकुल निधी स्वीकारण्यात आला नसल्याचे प्रकल्प अधिकारी आर.के. बामणे यांनी नमूद केले. परंतु, पुढील वर्षाचा निधी स्वीकारण्याच्या दृष्टीने प्रतीक्षा यादीतील उपेक्षितांचा शोध घेऊन त्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे एक लाख रुपये खर्चाच्या या घरकुलासाठी शासनाकडून ९५ हजार रुपये अनुदान मिळते. उर्वरित रुपये लाभार्थ्याने भरायचे किंवा बांधकामासाठी अंगमेहनत करायची. याप्रमाणे जिल्ह्यात घरकुलांचा लाभ देण्यात आलेला आहे. यामुळे घरकुलापासून कोणीही वंचित राहिलेले नाही. तरीही, प्रतीक्षा यादीतील कुटुंबांची चौकशी करून वंचितांना शोधले जात आहे.
वंचित बेघर कुटुंबांचा घेतला जातोय शोध
By admin | Published: September 22, 2015 1:53 AM