मुंबई - राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि महिलांवरील अत्याचार यावरून विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात मतभेद असल्याचं समोर आलं. रोहित पवारांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला तर जयंत पाटील यांनी हे सरकारचं अपयश असून एका व्यक्तीला दोष देणार नाही असं म्हणत राजीनाम्याला काही अर्थ नाही असं म्हटलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, आता २ महिनेच राहिले आहेत. २ महिन्यासाठी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे त्याला काही अर्थ वाटत नाही. हे अपयश संपूर्ण सरकारचं आहे. एका व्यक्तिला दोष देणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार महाराष्ट्रात अपयशी ठरलेलं आहे. महिलांना, बालकांना ते संरक्षण देऊ शकत नाही. आता पोलिसांवरही हल्ले व्हायला लागलेत. त्याचा अर्थ पूर्णपणे महाराष्ट्रात पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रकार सरकार करत आहे. कुणाची कधी बदली होईल, कोणत्या कारणासाठी होईल, सगळ्याच बदल्या आर्थिक व्यवहाराने झाल्या तर नैतिकता राहिली कुठे हा प्रश्न महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांबद्दल जनतेला पडायला लागला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आज कोयता गँग पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करतो, तो अत्यंत गंभीर आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडले आहेत. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. पोलिसांनी नियंत्रण आणण्यासाठी कठोर पाऊल उचललं गरजेचे होते. मात्र गृह खात्याचा भोंगळ कारभार पुढे आलेला आहे. त्यातून पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होतंय. अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाही, गुन्हेगारी प्रबळ व्हायला लागली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलामागे सरकारने ठाम उभे राहिले पाहिजे. अशा दृष्ट प्रवृत्ती संपवण्यासाठी सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या पोलीस दलाकडे लक्ष नाही. ते राजकारणात गुंतले आहेत. त्यामुळे पोलिसांवर हल्ले करण्याची कुवत गुंडाची झाली आहे. कोयत्याने पोलिसावर हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक आहे. पुण्यातील पोलीस यंत्रणा किती दुबळी झाली हे पुन्हा एकदा समोर आले असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
काय म्हणाले रोहित पवार?
जर सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच सुरक्षित वाटत नसेल तर या महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली आहे हे बघा. खासदार, माजी खासदारांना सुखरुप वाटत नसेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. आम्ही हे आधीपासून म्हणतोय. राज्यात महिलाही सुखरुप नाही, नेतेही सुरक्षित नाहीत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र? अशी म्हणायची वेळ आली आहे असं सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन असं विधान शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी केले होते. त्यावर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळेंनीही मागितला होता राजीनामा
बदलापूरच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. गृहमंत्री दिल्लीत जास्त असतात. महाराष्ट्रात घटना घडते परंतु प्रतिक्रिया दिल्लीतून जास्त येते. त्यामुळे गृहमंत्री कदाचित पार्ट टाईम महाराष्ट्रात काम करतात. ही घटना प्रचंड वेदनादायी आहे. नैतिकतेच्या आधारावर या सर्व गोष्टींची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी. पोलिसांच्या बदल्या करून गृहमंत्र्यांची जबाबदारी सुटत नाही. ही एक घटना नाही, तर महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केली होती.