Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत. मात्र, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पाटील यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी दगाफटका केल्याने पक्ष श्रेष्ठींद्वारे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्याविरोधातही कारवाईचे संकेत आहेत. आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचे स्वतः पाटील यांनीच सांगितले आहे. पण महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही निर्णय घेऊ
नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची नाही. शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही निर्णय देऊ, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहकारी कारखान्यात निवडणूक असल्यामुळे ते बिझी आहेत. मात्र, फोनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संपर्क साधणार आहोत. त्यानंतर महाविकास आघाडीचा पाठिंबा कुणाला आहे, हे ठरेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय रद्द केला. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला. सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप यासंबंधीची अधिकृत घोषणा झालेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"