ठाकरे सरकारच्या कॅबिनेट निर्णयाविरोधात काँग्रेसमध्ये मतभेद?; फेरविचार करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:06 PM2021-09-23T18:06:55+5:302021-09-23T18:07:42+5:30
आम्ही काँग्रेस म्हणून मत मांडलं आहे. जो काही निर्णय घ्यायचाय तो सरकारला घ्यायचा आहे. सरकारने विचार करावा असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
मुंबई – आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेला ठाकरे मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. याबाबत लवकरच अध्यादेश काढून राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी पक्षातील काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचं मत डावललं जातंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) म्हणाले की, सरकार आणि संघटना या दोन बाजू आहेत. संघटना वेगळी आहे आणि सरकार वेगळं आहे. सरकारसमोर आम्ही आमचं मत मांडलं आहे. आता सरकारने विचार करावा. त्रिसदस्यीय प्रभागऐवजी दोन सदस्यीय प्रभाग करावेत ही काँग्रेसची मागणी आहे. आम्ही काँग्रेस म्हणून मत मांडलं आहे. जो काही निर्णय घ्यायचाय तो सरकारला घ्यायचा आहे. सरकारने विचार करावा. द्विसदस्यीय प्रभाग रचनेत योग्यरित्या निवडणुकीचा प्रचार केला जाऊ शकतो. स्थानिकांना त्यात न्याय देता येईल. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही लोकांची मते मांडली आहेत. त्यामुळे सरकारने आता निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले आहे.
तर जनतेचे प्रश्न आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही भूमिका मांडणे काँग्रेसचं काम आहे. अनेक लोकांनी मागणी आहे द्विसदस्यीय प्रभाग व्हावेत. परंतु कॅबिनेटमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळात सर्वांचे मत घेऊन निर्णय घेतला. प्रभाग रचना ही दोन सदस्यीय व्हावी हीच काँग्रेस मागणी आहे असं नाना पटोले म्हणाले परंतु नागरिकांच्या विकासासाठी सर्व एकमताने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे या निर्णयावरुन काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं उघड होत आहे.
प्रभाग रचनेतील बदलांवरुन राज ठाकरेंचा संताप
आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रभाग रचना करायची आणि पैसा ओतून निवडणुका जिंकायची. या पद्धतीचा त्रास लोकांना का, लोकांनी एकाऐवजी 3-3 उमेदवारांना का मतदान करायचं? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) उपस्थित केला आहे. जनतेला गृहीत धरुन हवे ते करायचं, हे योग्य व कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे, असेही राज यांनी म्हटले आहे.
3 सदस्यीय प्रभागरचनेला मंजुरी
महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ४ सदस्यीय प्रभागाचा प्रस्ताव होता परंतु अनेकांनी ३ सदस्यीय प्रभाग योग्य ठरेल असं म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ३ सदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी दिली. महाविकास आघाडीने एकमताने हा निर्णय घेतल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.