मुंबई – मराठा आरक्षणावरून राज्याच्या २ मंत्र्यांमध्येच जुंपल्याचे चित्र लोकांना पाहायला मिळालं. सरसकट मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याला मंत्री भुजबळांनी विरोध केला, त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी भुजबळांवर टीका केली. मंत्र्यांमधील या वादाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही पाहायला मिळाले. २ मंत्र्यांमधील वादावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाद न वाढवण्याच्या सूचना दोघांना दिल्या.
बुधवारी राज्याच्या कॅबिनेटची बैठक होणार झाली. मराठा आरक्षणावरून या बैठकीत वाद रंगणार अशी चर्चा सुरू होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. भुजबळ आणि देसाई यांना किमान दिवाळी संपेपर्यंत या विषयावर भाष्य करू नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी मंत्री भुजबळ म्हणाले होते की, मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात येऊ शकते. तर भुजबळांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने करण्याची सवय आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं होते. या बैठकीत भुजबळांनी त्यांचे विधान स्पष्ट केले, त्याचसोबत २ महिन्यांपूर्वी जालनातील अंतरवाली सराटी इथं गावात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर झालेल्या हिंसाचारात पोलीस प्रेक्षकांच्या भूमिकेत कसे गेले याकडे लक्ष वेधले. तर भुजबळांच्या विधानावर बोलताना अशीच परिस्थिती राहिली तर सरकार पडेल असं मत मांडल्याचं बैठकीत उपस्थित एका मंत्र्याने माहिती दिली.
सूत्रांनुसार, बैठकीत भुजबळांनी सांगितले की, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या काळात राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यांनी काही विधाने केली तर त्यावर दुसऱ्या बाजूनेही उत्तरे दिली जातील. एका बाजूने विधाने केले जातील तर दुसरी बाजू गप्प कशी बसणार असं म्हटलं. या बैठकीत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी मंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेकडील मंत्री यांच्यात स्पष्ट फूट पडल्याचे दिसले. तेव्हा भाजपा दोन्ही बाजूने साम्यंजस्याची भूमिका घेत होती. दरम्यान, महायुतीत विसंवाद असल्याचं चित्र राज्यात जाऊ नये यासाठी समन्वय ठेवा, जाती धर्मात तेढ होईल अशी विधाने टाळा, दिवाळीत वातावरण बिघडू देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना दिल्यात. बिहारने आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय त्यावरही मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली.