जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 04:28 PM2024-01-01T16:28:51+5:302024-01-01T16:31:52+5:30
Lok Sabha Election 2024: जागावाटपावरून मविआमधील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे.
मुंबई - गेल्या ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला महाराष्ट्रात आव्हान देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढून भाजपाला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी करत आहे. मात्र जागावाटपावरून मविआमधील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा परभव करणे हेच काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्य आहे. भाजपाविरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढू ही काँग्रेसची भुमिका आहे असे स्पष्ट करत उलट महायुतीतच जागा वाटपावरून तीव्र मतभेद आहेत, त्यांच्यात भयानक तणाव आहे परंतु भाजपा शेवटी ईडी, सीबीआयचा वापर करुन त्यांना शांत करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
भारतीय जनता पक्ष अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा राजकीय स्टंट करत आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, अयोध्येत प्रभूरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात असताना हिंदु धर्माचे प्रमुख शंकराचार्य यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करु नये असे म्हटले आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असून ते पाप ठरेल असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजपा स्टंट करत आहे का हे माहित नाही पण हिंदु धर्म भ्रष्ट करु नये अशीच बहुसंख्य हिंदुंची भावना आहे, असेही नाना पटोले म्हणाले.