मुंबई : शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी मात्र त्यास विरोध दर्शविला आहे. ही योजना सुरू ठेवावी असा आग्रह काही आमदार मुख्यमंत्र्यांकडे धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे गटातील ४० आमदार मागच्या सरकारचा भाग होते. त्यावेळी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवभोजन थाळीची केंद्रे मिळाली होती. त्यामुळे योजना सुरू राहावी, या मताचे ते आहेत. एका आमदाराने ‘लोकमत’ला सांगितले, की योजना बंद करणे योग्य होणार नाही. योजनेतील उणिवा दूर करण्यास आमचा विरोध नसेल. शिवभोजन थाळी योजनेची केंद्रे ही काँग्रेस, राष्ट्रवादी वा शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली होती.
भाजपचे कार्यकर्ते मात्र वंचित राहिले होते. त्यामुळे ही योजना बंद करून गोरगरिबांच्या जेवणाची नवीन योजना आणायची आणि त्यानिमित्ताने भाजप व शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या संस्थांना ही केंद्रे देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे म्हटले जाते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपले खाते या योजनेचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.