मुंबई : गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमानिमत्ताने लावण्यात आलेल्या पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नसल्याचे पाहायला मिळत होते. मात्र माध्यमातून बातम्या येताच पोस्टरवरून गायब झालेलं कमळाच चिन्ह पुन्हा फुललं आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नसल्याचे पाहायला मिळत होते. तसेच यावर कोणत्याही भाजप नेत्यांचे फोटो नसल्याचे सुद्धा पाहायला मिळत होते. यामुळे तर्कवितर्क काढले जात होते.
त्यांनतर ही बातमी माध्यमांमध्ये येताच लावलेली बॅनर्स काढण्यात आली असून त्या जागी नव्याने बॅनर्स लावण्यात आली आहेत. तर आधीच्या बॅनर्सवरून गायब झालेलं कमळाच चिन्ह पुन्हा फुललं असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी पंकजा मुंडे भाजपमध्येच राहणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
उद्या पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्या काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर पक्षावर नाराज आहात का? असा प्रश्न भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना माध्यमांनी विचारला असता, इतके दिवस थांबला आहात. आणखी एक दिवस थांबा असं उत्तर पंकजा मुंडेंनी माध्यमांना बोलताना दिले आहे.