मुंबई : महागाई नियंत्रण, मध्यमवर्गाला दिलासा, देशावरील मंदीचे मळभ दूर करण्यासाठी, उद्योगांना उभारी, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणत्याही भरीव उपाययोजना न करता केवळ घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातूनही देशवासीयांची पुन्हा एकदा निराशा झाल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या. मात्र त्या घोषणा पूर्णत्वास नेण्यासाठी पैसा कुठून येईल याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणातून मिळाले नाही, असं मुंडे म्हणाले. देशावर मंदीचे सावट आहे. मात्र सरकारकडून जाणीवपूर्वक धर्मा-धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान केले जात आहे. अर्थ मंत्र्यांवर आणि त्यांनी केलेल्या घोषणांवर विश्वास कसा ठेवायचा ? असा सवाल करत हे सरकार भांडवल निर्मिती, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धी करू शकले नसल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान मोदी किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये आत्मविश्वास दिसून आला नाही. या सरकारकडे योजना अंमलात आणण्यासाठी पैसाच नाही, त्यामुळे आता IDBI, LIC, AIR INDIA सारख्या कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यामुळे दिशाभूल करणारा, भारताची निराशा करणारा, अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा असा हा अर्थसंकल्प आहे. नेहमीप्रमाणे मोदी सरकारने देशवासीयांची घोर निराशा केल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.