सूर्यकांत निंबाळकर -आदर्की वाठार स्टेशन आणि आदर्की रेल्वे स्थानकादरम्यान मिरजेहून साखर घेऊन पुण्याला निघालेल्या मालगाडीचे १६ डबे रूळावरून घसरल्याने बुधवारी पहाटे हाहाकार उडाला. या मार्गावरील सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना पर्याय शोधावा लागला. एकीकडे प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आदर्कीच्या माळावर मदत कार्यात गुंतलेल्या शेकडो कामगारांची भरउन्हात काम करताना फरफट झाली. रूळांचा सत्यानाश आदर्की ते वाठार स्टेशन या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे रूळ अक्षरश: उद्ध्वस्त झाले. रूळांच्या मध्ये असणारे स्लीपर्स सिमेंटचे होते. रेल्वेचे डबे रूळावरून घसरून दूर फेकले गेल्यानंतर सर्व स्लीपर्स तुटले. अपघातस्थळाच्या परिसरातील स्लीपर्सचा चुरा झाला होता. त्यामुळे रूळही जागचे हलून दूर फेकले गेले. भरावापासून खालच्या बाजूला रूळ फेकले गेल्याने रेल्वे मार्ग हा खडीकरण केलेल्या रस्त्यासारखा दिसू लागला होता. रेल्वेचे काही डबे जवळच्याच दगडी बांधकामाला धडकले तर सुमारे पाच डबे भरावापासून खाली फेकले गेले. या प्रक्रियेत रूळांवर ताण येऊनच ते एकमेकांपासून दूर केले आणि स्लीपर्सचा चक्काचूर झाला. ना सावली, ना पाणीरेल्वे अपघात झाला, त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात एकही झाड नाही. त्यामुळे भरउन्हात कामगार व अधिकाऱ्यांना उन्हाचा चटका सहन करावा लागला. अपघातस्थळाच्या आसपास पाण्याचीही सोय नसल्याने कामगार मधूनच काम सोडून एक किलोमीटर अंतरावरील धोम-बलकवडी कालव्याकडे धाव घेत होते. बाटली, कॅन, घागरींमधून पाणी आणून पीत होते. दुपारनंतर घटनास्थळापासून तीनशे मीटर अंतरावर टँकर आणण्यात आला आणि पाण्याची सोय झाली.पुरी-भाजीही अपुरीच४पाण्याची कशीबशी व्यवस्था कामगारांनीच करून घेतली असली, तरी दुपारी दोनपर्यंत त्यांना खाण्यासाठी काहीच नव्हते. अखेर दोन वाजता एका रिक्षातून पुरी-भाजी आणण्यात आली, तेव्हा कामगार अक्षरश: त्यावर तुटून पडले. मिरज, पुणे आणि रेल्वेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनाच हा नाष्टा देण्यात आला. परंतु सुमारे दोनशे ते तीनशे कर्मचाऱ्यांना उपाशीपोटीच काम करावे लागले. काही कामगारांनी जेवणाचे डबे आणले होते. तेच सर्वांनी मिळून खाऊन दिवस व्यतीत केला.सर्वच गाड्या रद्द४अपघातामुळे रेल्वे रूळ ठिकठिकाणी वाकले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत लाइन सुरळीत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते. तथापि, पुणे ते मिरज हा एकेरी लोहमार्ग असल्याने या मार्गावरील सर्वच गाड्या रद्द कराव्या लागल्या. यात महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे पॅसेंजर, कोल्हापूर पॅसेंजर, कोयना एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. या मार्गावरून वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा हजारो रेल्वे प्रवाशांना आहे.अपघाताची होणार चौकशीसाखरेने भरलेले मालगाडीचे सोळा डबे रुळावरून कसे घसरले, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मदतकार्य पूर्ण होऊन रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्यावरच अपघाताची चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.आदर्कीजवळ मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातामुळे सुमारे अडीचशे मीटर अंतरातील रेल्वे रूळ अक्षरश: उखडून इतस्तत: फेकले गेले आहेत. बहुतांश रूळ वाकडे झाले आहेत. त्यामुळे या टापूतील रूळ बदलावे लागणार आहेत. मिरजहून यासाठी मोठी मदतसामग्री घटनास्थळी दाखल झाली आहे. रेल्वे मदत पथकाचे सहा डबे क्रेनसह आदर्कीच्या माळावर उपस्थित आहे. दरम्यान, रात्री आठ वाजता डबे बाजूला करण्याचे काम संपले. त्यानंतर खडी पसरून सारखी करण्याच्या कामास प्रारंभ झाला. मिरजहून आलेल्या मदत पथकाच्या गाडीत जनरेटर आणि विद्युत सामग्री असल्याने आदर्कीचा माळ रात्री प्रकाशमान झाला. विद्युतझोतात काम सुरूच राहिले. मदत पथकाच्या गाडीत सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांचे भोजनही असते. तथापि, दिवसभर सुमारे साडेतीनशे कामगार येथे राबत होते, तर रात्रपाळीला दीडशे कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली.सुमारे अडीचशे मीटर टापूतील रूळ पूर्णपणे बदलावे लागणार आहेत. त्या दृष्टीने रात्रीही नव्या जोमाने युद्धपातळीवर काम सुरू झाले. रेल्वेच्या रुळाचा पृष्ठभाग नव्वद मिलीमीटरने एका बाजूला कलता असतो. तो तसा नसल्यास रेल्वेगाडी व्यवस्थित धावू शकत नाही. उताराची पातळी थोडी जरी चुकली, तरी ते धोकादायक ठरू शकते. ही पातळी तपासून नवे रूळ टाकण्यात येत आहेत. रूळ मिरजेहूनच आणण्यात आले असून, अवजड यंत्रसामग्रीचा माळावर राबता रात्रीही सुरूच होता. यंत्रसामग्रीच्या धडधडीने माळ जागा झाला होता. दरम्यान, अपघातानंतर दोन इंजिनचालक काही वेळ आदर्की रेल्वे स्थानकावर होते. तथापि, अपघात कसा झाला, याविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. अधिकाऱ्यांनीही चौकशीतूनच काय ते निष्पन्न होईल, असा सूर आळवला. (वार्ताहर)यापूर्वीही साखरेचीच गाडीरेल्वे सुरू झाल्यापासून आदर्की पट्ट्यात एकही अपघात आजअखेर झाला नाही. मात्र, येथून जवळच असलेल्या सालपे गावाच्या हद्दीत, पुण्यापासून १०२ किलोमीटर अंतरावर दहा वर्षांपूर्वी मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले होते. विशेष म्हणजे, या गाडीतही साखरेची पोतीच होती. त्या वेळी रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास तीन दिवस लागले होते. तथापि, या तीन दिवसांच्या काळात वाठार ते लोणंद अशी एसटी वाहतूक सुरू करण्यात आली होती. रेल्वेगाड्या लोणंद आणि वाठारला थांबत असत. तेथून प्रवाशांना एसटीने नेण्यात येत होते आणि पुन्हा रेल्वेत बसविण्यात येत होते. आजकाल त्याहून अधिक क्षमतेची आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री रेल्वेकडे उपलब्ध असल्याने रेल्वेमार्ग लवकरच सुरू होईल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच
By admin | Published: April 22, 2015 10:36 PM