मुंबई : राज्यातून हज यात्रेला जाणाऱ्या १ हजार ६३६ यात्रेकरूंना महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन चमूद्वारे नुकतेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. यात ८१८ महिलांचाही समावेश होता. यात्रेकरू महिलांना प्रथमच असे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले की, मुंबईतील ‘हज हाउस’ येथे मुख्यालय असणाऱ्या ‘हज कमिटी आॅफ इंडिया’द्वारे हज यात्रेकरूंना यात्रेला जाण्यापूर्वी प्रशिक्षण देण्यात येते. हज यात्रेकरूंसाठीच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे व रायगड या चार जिल्ह्यांतून हज यात्रेला जाणाऱ्या १ हजार ६३६ यात्रेकरूंसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या प्रशिक्षणावेळी हज यात्रेला जाणाऱ्या ८१८ महिला व ८१८ पुरुषांना आपत्कालीन व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण देण्यात आले.हे प्रशिक्षण आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण कक्ष पर्यवेक्षक राजेंद्र लोखंडे यांनी दिले. प्रशिक्षणावेळी आपत्ती उद्भवल्यास काय करावे व काय करू नये, याबाबत हज यात्रेकरूंना संगणकीय सादरीकरणासह मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)>हज यात्रेला देशातून दरवर्षी सुमारे १ लाख ७० हजार तर जगभरातून सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक यात्रेकरू जातात. सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी देशातून जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंचा व यात्रेसंबंधी विविध बाबींचा समन्वयन ‘हज कमिटी आॅफ इंडिया’ द्वारे केले साधला जातो. यात्रेकरूंना ‘हज कमिटी आॅफ इंडिया’ द्वारे प्रशिक्षण दिले जाते.- खालिद अरब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी आॅफ इंडिया
हज यात्रेकरूंना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
By admin | Published: August 22, 2016 5:44 AM