ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले. चार दिवसांच्या उपचारांनंतर पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ' मला एका जागी बसून रहायची सवय नाही, पुढील दोन महिन्यात मला एकही सुट्टी घेता येणार नाही, त्यामुळे आता विश्रांती कशी घ्यायची ते बघू' अशी प्रतिक्रिया पवार यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यावर दिली.
पवार यांना अतिश्रमामुळे थकवा आल्याने त्यांना रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बरीचशी सुधारली. मात्र दक्षता म्हणून त्यांना दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. अखेर आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.