मुंबई : जनतेत असंतोष आहे. ईव्हीएमने हे जिंकू शकतात आणि हे जिंकत आहेतच. मात्र, आता हे जिंकणार नाहीत, असा गैरसमज पसरवत आहेत. जनता हा लोकशाहीतला सर्वांत मोठा घटक आहे. जनतेच्या मनाविरुद्ध तोडाफोडीचे राजकारण भाजप करत आहे. जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले तर मोठा असंतोष पसरेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत भाजपच्या लोकसभेच्या पहिल्या यादीवरून टीका केली. ते म्हणाले, उद्योगपती, शेतकरी, कामगार यांच्यात असंतोष आहे. आपण जनतेसोबत आहोत. क्रांती ही नेते करत नसून क्रांती जनता करते. जनतेच्या मनाविरुद्ध झाले तर जनता क्रांती करणारच, भाजपने चंदीगडमध्येही अशा प्रकारे जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीनंतर असाच प्रयत्न केला. मात्र, आता तोडा, फोडा, तुरुंगात टाका आणि राज्य करा हे जास्त काळ टिकणार नाही. राज्यातल्या तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत फक्त घोषणा पोहोचतात, प्रत्यक्षात काहीच नाही. दहा वर्षांत अनेक जुन्या योजनांची नावे बदलली आहेत, तसेच आता जुमलाचे नाव गॅरंटी झाले आहे, अशीही टीका त्यांनी केली.
भाजपने गडकरींसारख्या निष्ठावंताला डावललेभाजपने १९५ जणांची यादी जाहीर केली. मात्र, नितीन गडकरींचे नाव पहिल्या यादीत नाही, तर बेहिशेबी मालमत्ता जमवणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचे नाव पहिल्या यादीत आहे. ही आजची भाजप आहे, असे ठाकरे म्हणाले.