सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : राज्य शासनाने बांधकाम व्यवसायला उभारी देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहीर केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत दस्त नोंदणीत चांगलीच वाढ झाली आहे. शासनाच्या महसुलात देखील मोठी भर पडत आहे. जुलै महिन्यात राज्यात केवळ 1 लाख 65 हजार 139 दस्त नोंदणी झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात या मध्ये तब्बल 75 हजारांची वाढ होऊन दस्त नोंदणी 2 लाख 40 हजारांवर जाऊन पोहचली. यामध्ये दसरा- दिवाळीत मोठी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
राज्यात मार्च महिन्यात आलेली कोरोना महामारी आणि त्यानंतर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका बांधकाम व्यवसायला बसला होता. याचा शासनाच्या महसुलावर देखील फार मोठा परिणाम झाला. यामुळेच राज्य शासनाने ऑगस्ट महिन्यात स्टॅम्प ड्युटीवर तीन टक्के सवलत जाहिर केली. शासनाच्या या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण राज्यात बहुतेक सर्वच जिल्ह्यात कॅन्टेमेन्ट झोनमधील दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. यामुळे खुपच कमी प्रमाणात दस्त नोंदणी झाली. त्यानंतर शासनाच्या अनलॉक प्रक्रियेत दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यात आली. परंतु जून , जुलै महिन्यांत देखील दस्त नोंदणीत अपेक्षित वाढ झाली नाही. यामुळेच शासनाने डिसेंबर 2020 अखेर पर्यंत स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के आणि त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत दोन टक्के सवलत देण्याचे जाहिर केले आहे. यात गत वर्षीच्या तुलनेत अद्यापही दस्त नोंदणी कमी असली तरी दस्त नोंदणीची वाढती संख्या समाधानकारक आहे. राज्य सुरुवातीचे तीन महिने दस्त नोंदणीत तब्बल 60 टक्के घट झाली होती. आता ही घट 30 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. ------राज्यात एप्रिल ते सप्टेंबर अखेर पर्यंत झालेली दस्त नोंदणी व मिळालेला महसुल महिना दस्त नोंदणी महसुल (कोटीत) एप्रिल 1139 273.39मे 39769 414.75 जून 153155 1260.54जुलै 165139 1309.92ऑगस्ट 183515 1416.45सप्टेंबर 240333 1514.74-------ग्राहकांना घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ शासनाने बांधकाम व्यावसाय आणि लोकांना दिलासा देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के सवलत दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचा चांगलाच फायदा झाला असून दस्त नोंदणी आणि महसुलामध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या या निर्णयाचे केंद्र शासनाने कौतुक केले असून, राजस्थान व अन्य काही राज्यांनी याबाबत विचारणा केली आहे. ही तीन टक्क्यांची सवलत डिसेंबर अखेर पर्यंत आहे. यामुळेच ग्राहकांना घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ असून, जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा.- ओमप्रकाश देशमुख, नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य --------मार्केट पुन्हा उभारी घेकोरोनामुळे मार्च ते मे-जूनमध्ये बहुतेक सर्वच व्यवहार ठप्प होते. याचा मोठा फटका बांधकाम व्यावसायाला फटका बसला आहे. परंतु शासनाने स्टॅम्प ड्युटीत सवलत दिल्यानंतर बांधकाम व्यावसाय पुन्हा एकदा उभारी घेत आहे. बिल्डरांकडून देखील मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. यामुळे लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल.सतिश मगर, बांधकाम व्यावसायिक