लातूर : उत्तर प्रदेश सरकारने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात दलित, आदिवासी, ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा आहे. आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले.लातूर मनपातील भाजपा-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते लातुरात आले होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची भूमिका ‘सबका साथ सबका विकास’ ही आहे. त्यामुळे जातींच्या आधारे घटनेने दिलेले आरक्षण रद्द होईल, असा प्रचार केला जातो, तो खोडसाळपणा आहे. उत्तर प्रदेश सरकारने तसा निर्णय घेतला असेल, तर आपण योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात प्रयत्न करू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष उभा करण्यास आम्हाला अपयश आले आहे. अद्याप रिपाइंचे उमेदवार निवडून येत नाहीत. तरुण कार्यकर्त्यांचा ओघ अन्य पक्षांकडे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात रिपाइंला यश आले नाही. नव्या उमेदीने आता पक्ष उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांना आकर्षित करावे लागेल. (प्रतिनिधी)
वैद्यकीय आरक्षणाबाबत योगींशी चर्चा करणार
By admin | Published: April 17, 2017 3:00 AM