युती-आघाडीकडून घटकपक्ष दुर्लक्षीत; सत्तास्थापनेत प्रमुख पक्षांमध्येच चर्चा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:35 PM2019-11-20T12:35:41+5:302019-11-20T12:36:04+5:30
आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. तर प्रमुख राजकीय पक्षांच ठरत नसल्याने सर्वांच घटकांची कोंडी होत आहे. या गोंधळात युती आणि आघाडीसोबत असलेले मित्रपक्ष चांगलेच हैराण झाले आहेत.
शिवसेना समसमान वाटपासाठी आग्रही असल्यामुळे युतीत खिंडार पडले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपने आपण सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना पुढे काय असा प्रश्न पडला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात शरद पवार आणि सोनिया गांधी करतील ती पूर्व दिशा आहे. परंतु, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेकाप हे कुठेही दिसत नाहीत. अर्थात आघाडीच्या चर्चेपासून ते दूर आहेत.
दुसरीकडे युतीसोबत असलेले विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष , महादेव जाणकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष अजुनही भाजपची सत्ता येईल याच आशेवर आहे. या तिन्ही मित्रपक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांना भाजपच्याच भूमिकेवर लक्ष ठेवून राहावे लागत आहे.
एकूणच आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.