प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीची चर्चा पुन्हा निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:29 AM2019-01-30T04:29:06+5:302019-01-30T06:12:26+5:30
महाआघाडीसाठी मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी भेट घेतली.
मुंबई : महाआघाडीसाठी मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे, तर काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत कोणताच प्रस्ताव मिळाला नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाआघाडीसाठीची सहावी बैठकही निष्फळ ठरली आहे.
महाआघाडीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी ३० जानेवारीपर्यंतची मुदत दिल्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी राजगृह येथे आंबेडकरांची भेट घेतली. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे आंबेडकर यांनी बैठकीनंतर सांगितले. काँग्रेससोबत आघाडीसाठी आम्ही अजूनही तयार आहोत. मात्र, एमआयएमसोबतची युती तोडणार नसल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीबाबतच्या आक्षेपांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.