यदु जोशी,
मुंबई- महापालिका निवडणुकीसाठीची भाजपा-शिवसेना या दोन पक्षात सुरू असलेली युतीची बोलणी थांबली असून आता एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे आता युतीच्या भवितव्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे.युतीसाठी दोन्ही पक्षांकडून नेमण्यात आलेल्या नेत्यांमध्येच रुसवेफुगवे झाले असून बोलणीऐवजी त्यांनी एकमेकांशी कट्टी केल्याचे आजचे चित्र आहे. मुख्यमंत्री देतील तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी लोकमतला सांगितले तर, ‘आम्ही मुख्यमंत्र्यांना भूमिका कळविली आहे. आता त्यांनीच काय तो निर्णय घ्यावा’ असे सांगत शिवसेनेचे नेते आ.अनिल परब यांनी हात वर केले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते युतीबाबत एकमेकांशी चर्चा करतील का, कधी करतील आणि त्यातून काय बाहेर येईल या बाबत उत्सुकता आहे. भाजपाकडून ११४ जागांची यादी शुक्रवारी शिवसेनेला दिली जाणार होती. मुख्यमंत्र्यांनी काल या यादीवर शिक्कामोर्तब केले होते. असे काहीही झाले नाही. ‘आज युतीची चर्चा होणार नाही,’ असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांतून सांगण्याऐवजी थेट कळविले असते तर बरे झाले असते, अशी नाराजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, युतीसाठी चर्चेकरता शिवसेनेकडून ज्युनिअर नेत्यांना पाठवले. किमान भाजपाकडून वरिष्ठ नेते चर्चेला असताना, अशी अपेक्षा नव्हती. युतीच्या चर्चेस भाजपाकडून येत असलेले तावडे, प्रकाश महेता, आशिष शेलार या तिघांवरही आरोप आहेत. त्यामुळे आम्हाला पारदर्शकतेची सुरुवात करायची असती तर तिथून केली असती, असा हल्लाबोल सेनेचे नेते आ. परब यांनी आज केला. त्यावर ‘याआधी युतीसाठी दोन बैठका झाल्या. त्याला आम्ही तिघेही हजर होतो. तेव्हा आमच्यावर आरोप आहेत हे शिवसेनेला सुचले नाही का, तेव्हा आक्षेप नव्हता मग आताच उपरती का झाली,’ असा सवाल तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपाने मागितलेल्या ११४ जागा सेनेने अमान्य केल्या असून तसे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे. >युती होणार कशी?भाजपा-सेनेची युती झाली तर शिवसेनेला निवडणूक होईपर्यंत मोदी-अमित शहांवर टीका न करण्याचा तह करावा लागेल.युती झाली तर मुंबई महापालिकेच्या कारभारावरील टीकेसंदर्भात आशिष शेलार यांच्या तोंडाला कुलूप लागेल. युती झाली तर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा जिवंत होईल, असा तर्क दिला जात आहे.>बालेकिल्ल्यात भाजपाला हव्या जागाशिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परळ, वरळी, दादर, माटुंगा, माहीम अशा भागांतही भाजपाने जागा मागितल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. तथापि, आता हे भाग पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांचा तोंडावळा बदलला आहे. टॉवर्स उभे झालेत, मतदारांची मानसिकतादेखील बदलली आहे, हे शिवसेनेने लक्षात घ्यावे, असा टोला भाजपाच्या एका नेत्याने हाणला. 2 वर्षांपूर्वी आम्ही कमळाला मते द्या म्हणून लोकांना आवाहन केले. आता युती केली तर धनुष्याला मते द्या, असे काही ठिकाणी सांगावे लागेल. तीन वर्षांनी पुन्हा कमळाला मते द्या म्हणावे का, असा सवाल भाजपा आमदारांनी केल्याचे समजते.>आरोप जिव्हारीखा. किरीट सोमय्या, आ. आशिष शेलार हे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर करीत असलेले आरोप सेनेच्या जिव्हारी लागले आहेत.>भाजपा अस्वस्थदुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेमुळे भाजपा अस्वस्थ असून युतीतील दुराव्याचे हेही एक कारण आहे. >मुंबईतील आघाडी संपुष्टात - तटकरेमुंबई महानगरपालिका निवडणुकीतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याची शक्यता कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच संपुष्टात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला. काही जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू आहे.