मुंबई, दि. 9 - मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर मोर्चातील सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपवले. यावेळी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाली. दरम्यान मराठा आंदोलनकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या निर्णयाविना आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चातील आंदोलकांनी केला होता. मुंबई मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मोर्चाला 25 लाख लोक आले होते, असा दावा केला आहे.
मराठा समाजाने आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी काढलेला हा 58 वा मोर्चा आहे. या मोर्चाला विक्रमी गर्दी झाली आहे. आंदोलक आझाद मैदानात दाखल होत असताना या मोर्चाचे एक टोक चेंबूरपर्यंत होते. दरम्यान, या मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनातही उमटले. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत गोंधळ झाला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. ''मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नाही. आतापर्यंत शिस्तबद्ध मोर्चे निघाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन कुणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, अशी आमची आधीपासूनची मागणी आहे'', असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
आरक्षण न देण्याचं कोणतंही कारण नसताना आरक्षण द्यायला दिरंगाई नको. सरकारने लवकरात लवकर ठोस भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकढा पाठिंबा असताना सरकारचं घोडं अडलं कुठे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 'चर्चा नको आरक्षण हवं', अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.