मुंबई - Prakash Ambedkar on Sharad Pawar ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे. ४ दिवसांपूर्वी शरद पवार आणि भाजपा नेते राजनाथ सिंह यांच्यात फोनवरून काय चर्चा झाली याचा खुलासा पवारांनी करावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ४ दिवसांपूर्वी शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला, त्याचे कारण काय? राजनाथ सिंह यांच्यासोबत काय चर्चा झाली, याचा खुलासा करावा. राष्ट्रवादीच्या ५ जागांबाबत शरद पवारांचे बोलणे झाले का? की एकनाथ शिंदे मुंबईतील ३ जागा लढवतायेत त्यावर बोलणं झालं?, उद्धव ठाकरेंबाबत काय बोलणं झालं याबाबत लोकांना शरद पवारांनी माहिती द्यायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच जेव्हा आमच्याशी चर्चा सुरू होती. तेव्हा आम्ही बैठकीत मागणी केली होती, जर आपण पुरोगामी मतदारांकडून मते घेत असू तर त्यांना कुठेतरी आपल्याला आश्वासित करावे लागेल. आपण पुढील ५ वर्ष जोवर लोकसभा, विधानसभा बरखास्त होत नाही तोवर भाजपासोबत जाणार नाही असं सार्वजनिकरित्या जनतेला सांगायला हवे असं आश्वासन जनतेला द्यायला हवे असंही प्रकाश आंबेडकरांनी आठवण करून दिली.
दरम्यान, या निवडणुकीत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे. ऐन निवडणुकीत शरद पवारांकडून फोन का करण्यात आला याचा खुलासा व्हावा. २०१४ मध्ये आपण निवडणूक होऊ नये यासाठी बाहेरून पाठिंबा दिला तसं राजनाथ सिंह आजारी होते, त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं उत्तर देऊ नये. हा बालबोध आम्हाला सांगू नका. नेमकी काय चर्चा झाली हे सांगावे अशी प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली. बारामतीच्या मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही उशिरा दिली असंही त्यांनी स्पष्ट केले.