ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ६ - शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मंदिराचे विश्वस्त आणि महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. ही परंपरा ४०० वर्षांची असल्याने ती मोडणे शक्य नसल्याचे विश्वस्तांचे म्हणणे होते, तर विश्वस्तांची भूमिका पटण्यासारखी नसल्याचे भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी सांगितले.
या बैठकीला संबंधितांबरोबरच स्थानिक नेतेही उपस्थित होते. प्रथा परंपरा पाळण्यावर विश्वस्त ठाम राहिले, तर पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही अधिकार मिळाला पाहिजे यावर कार्यकर्ते ठाम राहिले. कुणीच नमतं न घेतल्याने तिढा कायम राहिला आहे. मात्र, यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असे त्यांनी एकमताने ठरवले आहे. मंगळवारी भूमाता ब्रिगेडच्या प्रतिनिधी महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.