मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ चा अध्यादेश काढला आहे. मात्र या कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तर ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे प्रतिक्रिया आता सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली. मात्र 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची अट सरकारने घातली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर या मुद्यावरून प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.