मुंबई : राज्यातील खासगी क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विधेयकाचा नवीन मसुदा तयार केला असून लवकरच तो महत्त्वाच्या क्लास संस्थाचालकांना पाठविण्यात येईल. राज्यातील महत्त्वाच्या क्लास चालकांनी या मसुद्यावर आपली मते, सूचना आणि प्रतिक्रिया मांडण्याच्या सूचना सोमवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी दिल्या. दरम्यान, याआधी तयार केलेला कच्चा मसुदा तत्काळ रद्द करण्याची मागणीही या बैठकीत काही संघटनांनी केली आहे.मंत्रालयात क्लास संस्थाचालकांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अखेर खासगी कोचिंग क्लासेसही शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे मान्य केल्याची माहिती असोसिएशन आॅफ कोचिंग क्लास ओनर्स अॅण्ड मेन्टर्सच्या सचिव लदिका रुके यांनी दिली. तसेच नवीन मसुदा सर्व क्लास ओनर्सच्या, शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या सहमतीने तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.मागील हिवाळी अधिवेशनात क्लासचालकांवर नियमन यावे या उद्देशाने एक विधेयक तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. यानंतर तज्ज्ञ समितीने त्यासंदर्भात मसुदा तयार केला होता. तो पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर कोणतीही चर्चा तेव्हा झाली नाही. यानंतर आता हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर होईल आणि यावर चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘क्लास नियमनाच्या नवीन मसुद्यावर पुन्हा होणार चर्चा’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:10 AM