मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला सामोरे जात आहेत. पण, अनेक वेळा समन्स देऊनही परमबीर सिंह चौकशी आयोगासमोर हजर झाले नाहीत. यामुळे आता ते देश सोडून रशियाला गेल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते देश सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.
वळसे पाटील पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाबरोबरच आम्हीदेखील परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ते देश सोडून गेल्याच्या चर्चा मीही ऐकल्या आहेत, मंत्री असो, सरकारी अधिकारी असो, मुख्यमंत्री असो, भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्याविरोधात काय कारवाई करता येईल, त्यावर केंद्राशी चर्चा केली जाईल. महाराष्ट्र सरकार सध्या त्यांचा शोध घेत आहे. यासाठी त्यांच्याविरोधात एक लुकआउट नोटीस जारी केली आहे, असेही पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण ?25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका एसयूव्हीमध्ये जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या. ही कार मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीची होती. पण, अचानक त्यांचा मृतदेह एका ठाण्यात सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे स्फोटके ताब्यात ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. वाजे हे परमबीर सिंह यांचे जवळचे मानले जाता.
मार्चमध्ये एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. एनआयएने त्याच्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांना आरोपी बनवले नाही, परंतु आरोपपत्रात असे अनेक खुलासे करण्यात आले जे त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.